Thursday, May 24, 2018

संताजी घोरपडे पोवाडा

घोरपडे कुळी झुंजार । निपजला थोर । संताजी शूर ।
सेनापती मराठ्यांचा सरदार । करुनिया त्रस्त मोंगलाना ।
धाक बसविला । रणी चमकला ।धन्य तो वीर ।। जी जी जी ।।

अवरंगजेब शत्रू भारी । करीतसे स्वारी ।महाराष्ट्रावरी ।
चंग बांधून धाउन आला । मराठेशाही बुडविण्याला । अत्याचारांनी देश गांजीयला ।।

तुळापुरी वधियेला राजा । संभाजी महाराजा । उधळल्या फौजा ।
मराठ्यां कोणी  नुरला वाली । हाहाकार झाला देशभरी । जणू काय टोळधाड ही पातली ।।

महाराष्ट्रभर पसरुन आपुले सैन्य औरंगजेबानं जागोजागी केली नाकेबंदी
दारुगोळा तोफास्वार शिबंदी तशी खानांची उडविली गर्दि

सर्जाखान हिंमतखान‌ ।आसदखान कासमखान ।तर्बियत झुल्फिकारखान।
अली मर्दान दिलावरखान ।रणमस्तान ईस्माईलखान ।।

सूर्याजी पिसाळ फितविला। रायगड किल्ला ।काबिज केला‌।
शाहू बाळराजा धरुनि नेला। सवे महाराणी येसुबाईला। मर्मावर घाव त्यानं बघा घातला।।

वृत्त हे वायुवेगानं । देशी पसरुन । उठे खडबडुन ।
जनता जागृत पहा झाली। म्हणे घेउ सूड याच वेळी । कसोटिचि  वेळ खचित ही पातली।।
 उतरले मराठे तेव्हा पुर्‍या कसोटिला।। बांधुनि चंग त्यांनी तो लढा लढविला।।
देशकार्य धर्मकार्याचा ध्यास घेतला।। तन मन धन अर्पिती देशसेवेला ।।
भासले जणू सैतान तेव्हा शत्रुला।।

तेव्हा झाले कितिक रणगाजी। तसे मुत्सद्दी। महाराष्ट्रामाजी।
एकाहुन एक करिति शर्थ। तोड बघा नसे अितिहासात। अन्यत्र कुठं सार्‍या जगतात।।

त्या वीरामाजी वीरमणि। संताजी अग्रणी । नाव त्रिभुवनी ।
अैकावा पुढं काय प्रकार। पहिल्या चौकाचा झाला आकार। शाहीर श्रीकृष्ण रचणार।

- शाहीर श्रीकृष्ण रामचंद्र घुले



(Video Courtesy: Ashish Jog)

No comments:

Post a Comment