Sunday, August 28, 2016

शिवाजी महाराजांचा पोवाडा

धन्य धन्य श्री शिवछत्रपती महाराष्ट्र राणा
हिंदु राज्य स्थापि जो तुडवुनी बुडवुनी म्लेंछांना ‌‌॥धृ.॥

म्लेंछ भूप मातुनिया देशामाजि कहर जाला
फोडियली देऊळे बाटवि हिंदुमात्राला
जिझिया कर हिंदुंवर बसवुनि गोमाता वधिल्या
हिंदु अबला भ्रष्ट करोनि हाहा:कार केला
भूमाता त्रस्त जहालि । अशा या कालि। कोणि नच वाली।
साधुंचा जमला मेळा । भक्त ते होऊनि गोळा । आळविती जगदीशाला।
धाव श्रीधरा, धाव श्रीपते, हे राधारमणा ॥१॥

साधुंचे संरक्षण करुनि दुष्टां नाशाया
स्थापाया सतधर्मातें जगि घेसी प्रभुराया
युगायुगीं अवतारा ऐसे ब्रीद तुझे सदया
कां न धावसी त्रस्त भारतीं बा ऐशा समया
भक्तांचि पोचुनि हांक। देवलोकांत। चाललें बेत।
बोलती काय श्रीधर। गुरु वसिष्ठ घ्या अवतार। देशात करा संचार।
देवांनी मावळे बनावे शंकर शिवराणा ॥२॥

भक्तांचा धावा ऐकुनिया धरी अवतार
भोसले कुळी जिजाईपोटी शिव शिवनेरिवर
म्हणुनि शिवाजी नाव ठेविले ऐसे साचार
वसिष्ठ गुरुही धावुनि आले रामदास थोर
जय समर्थ जय रघुवीर। म्हणती संचार । करती देशभर।
महाराष्ट्र जागृतचि झाला। खडबडुनी वेगे उठला। समरासि सिद्ध जाहला।
असंख्य भाले जमति शिवाशी म्लेंछ असुर हरणा ॥३॥

सह्यगिरीच्या कडेकपारीमाजी हिंडुनिया
जणु वानरसे मर्द-मावळे घेऊनिया साह्या
तोरण्यावरी बांधिती तोरण हिंदुधर्म कार्या
कल्याणि लुट कसोटि ठरली शील पारखाया
त्या कसोटिला उतरले। धन्य जाहले। जगी गाजले।
यावनिला शिवप्रभु म्हणती। तुजसमगे लावण्यवती। माता जर अमुची असती।
आम्ही सुंदर झालो असतो शंका मज मुळि ना॥४॥

कपटमिषाने वधण्यालागी येता अफजुल्ला
डाव तयाचा तुवा तत्क्षणी त्यावर उलटविला
फोडुनि मग कोथळा सत्वरी शिरच्छेद केला
भवानिदेवीच्या चरणी जणु बोकड बळी दिधला
पाहुनि प्रकार असा। बादशहा  पिसा । जाहला कसा ?
'उंदीर नव्हे बोलला। सैतान गमतसे मला। मांत्रीक नाही का उरला?'
सिद्दी वेडा म्हणे 'मांत्रिक मी, गाडीन सैताना' ॥५॥

सिद्दी जोहारा चकवुनी मग तू हार दिली त्याला
पावनखिंडी लढवुनि बाजीप्रभु स्वर्गी गेला
विजापुरीची आदिलशाही येऊनि जेरीला
करुनी संधी शिवप्रभुपाशी जोडी स्नेहाला
यापरी शत्रु एक हा। जमवुनी पहा। उडविले अहा।
भिमथडी तट्ट वेगानं। खान्देशी उठवुनी रान। मोंगला करित हैराण।
सुरत लुटुनिया अवरंग्यासी देई आव्हाना॥६॥

शास्तेखाना शासन केले बोटे तोडून
धडकी भरुनि पळून गेला मोहिम सांडून
अवरंग्यासी चिंता पडली वार्ता ऐकून
दिलेरखान जयसिंग धाडले फौजा घेऊन
गड पुरंदराला झाला। शर्थिचा झगडा। वीर फाकडा।
मारिता मारिता मेला। मेल्यावर मारि अरिला। शिर तुटे धडाने लढला।
मुरारबाजी स्वर्गी गेला गाऊ यशगानां॥७॥

घ्यावा जाऊनि समक्ष शत्रुच्या घरचा ठाव
लावियले बोलणे यापरी योजुनि मनी डाव
जयसिंगासी मोह पडुनि जोडि प्रेमभाव
सावधानता राखुनि घेसी आग्र्यासी धांव
बादशहा भरवि दरबार। दख्खनी शेर। धीरगंभीर।
येऊनि पुढे ठाकला। चमकली गमे जणु चपला। तेज ते दिववि सकलाला।
दख्खनि शेरा डिवचि बादशहा करुनि अपमाना॥८॥

म्लेंछाच्या दरबारी जाता झाला अपमान
सह्य न झाला म्हणुनि तेथुनी जाई शिव निघुन
कपटी अवरंग्याने तेव्हा वेढा घालून
पंजरामधि पक्षि पकडला बोले हर्षून
हा पक्षि नसे बलहीन। जाई बघ उडुन। कधिच भुरकन।
अवरंग्या काय हे करिसी? अग्निसी खेळ खेळसी। होईल गुंग तव मती।
आहे त्याचा कावा कैसा न कळे रे कोणा॥९॥

पंजर फोडुनि पक्षि उडाला बसुनि पेटिकेत
हातावरती तुरी देऊनी येई दक्षिणेत
जिजाऊमातेच्या चरणांवर घाली दंडवत
अवरंग्यासी कळता बसला ऊरास बडवीत
देशात परत येऊनि। सैन्य जमवुनि। संधि साधुनी।
एकेक गड करी सर। किल्ले कोंढाण्यावर। धाडिला वीर झुंजार।
गड आला पण सिंहचि गेला मालुसरा तान्हा॥१०॥

यापरि करुनी चहुबाजूनी उडावणी जोर
मायभूमिला स्वतंत्र केले हाकलून चोर
सशास्त्र राज्याभिषेक जाहला रायगडावर
गोब्राह्मणप्रतिपालक ऐसे ब्रीद तुझे थोर
अवतारकार्य जाहले। ब्रीद राखले। जन सुखावले।
शिकवणी राष्ट्रप्रेमाची। शिकवणी अतुल धैर्याची। शिकवणी स्वार्थत्यागाची।
देऊनि सकळा हरहर गेला स्वर्गी शिवराणा॥११॥

छत्रपतीचा भगवा झेंडा अजुनी डौलाने
फडफड करुनी जना सांगतो एक विचाराने
कार्या लागुनी आशा सोडा खोट्या एकीची
परधार्जिणी नी आत्मघातकी वृत्ती न कामाची
सिद्ध होऊनी श्री शिवप्रभुला रामदास गुरुला
विनवा पुनरपि घ्या अवतारा तारा देशाला
जसे लोक त्या परी तयांचे देव ध्यानी आणा
कां न येती धावुनि होता तुम्ही सिद्ध वीर मरणा
बंधुनो बोध घ्या काहि। उगा लवलाहि। करा हो घाई।
स्थापण्या हिंदु राज्याला। राखण्या हिंदु धर्माला। जगविण्या हिंदु संस्कृतिला।
विनवी शाहिर श्रीकृष्ण तुम्हा वंदुनि शिवचरणां॥१२॥

- शाहीर श्रीकृष्ण रामचंद्र घुले 






No comments:

Post a Comment