Sunday, June 9, 2013

कोणी नसे कुणाचे



सहवास प्रेम मैत्री। ‌हे तंत्र बोलण्याचे ।
प्रत्यक्ष वेळ येता । कोणी नसे कुणाचे ॥धृ॥
कन्या स्नुषा नृपाची । प्रत्यक्ष राम वरता ।
पिचली क्षणाक्षणाला । कारुण्यरुप सीता ।
कामी तिच्या न आले । सामर्थ्य राघवाचे ॥१॥
त्यागून सूर्यपुत्रा । कुंती पुन्हा कुमारी ।
कर्णास अनुज माता । सारेच जन्म वैरी ।
कौतुक का करावे । या रक्तबंधनाचे ॥२॥
केली उभी पणाला । द्यूतात कृष्ण भगिनी ।
सम्राट पांडवांची । रानावनात राणी ।
पती पाच देव बंधू । तरी भोग हे तियेचे ॥३॥
ठेवू नको अपेक्षा । असल्या जगाकडूनी ।
निरपेक्ष आचरीता । कर्तव्य प्रेम दोन्ही ।
मग चालू दे सुखाने । अव्हेरणे जगाचे ॥४॥
(चाल: आनंदकंद ऐसा हा हिंद देश माझा अथवा शतजन्म शोधिताना )

No comments:

Post a Comment