Saturday, July 30, 2016

Tuesday, July 26, 2016

अठरा श्लोकी गीता.

बाबा आणि त्यांची भावंडे लहानपणी ही अठरा श्लोकी गीता म्हणत असत.
याचे कर्ते कोण यावर बरीच चर्चा चालायची. अखेर कधीतरी एकदा याचे मूळ कर्ते  गो.रा. मोघे  म्हणून गृहस्थ आहेत असे कळले.
यातील प्रत्येक श्लोकात एकेका अध्यायाचे सार आहे, भाषा साधीच पण प्रासादिक आहे, विविध प्रकारच्या वृत्तांत बांधलेली  आहे.

या अठरा श्लोकांच्या अंती जे दोन श्लोक आहेत, त्यातील पहिला उपसंहारात्मक आहे आणि दुसर्‍या श्लोकात ज्ञानेश्वरमाऊलींची प्रशस्ति आहे.


गेले कौरव आणि पांडव रणी वर्णी कथा संजय
ती ऐके धृतराष्ट्र उत्सुक मनें देई तयाते भय
पाही पार्थ रणी कुलक्षय घडे चित्ती विषादा धरी
युद्धापासुनि होऊनी विमुख तै टाकी धनुष्या दुरी ‌- १

झाला अर्जुन शोकमग्न बघुनी वेदान्त सांगे हरी
आत्मा शाश्वत देह नश्वर असे हे ओळखी अंतरी
घेई बाण धनू करी समर तू कर्तव्य ते आचरी
वागे नि:स्पृह हर्ष शोक न धरी ज्ञानी सदा ज्यापरी – २

अगा कर्माहुनी अधिक बरवे ज्ञान म्हणसी
तरी का तू येथे मजकरवी हिंसा करविसी
वदे तेव्हा पार्थाप्रति यदुपती कर्म करणे
फलेच्छा सांडूनी सहज मग ते ज्ञान म्हणणे – ३

हरा या भूभारा अमित अवतारासी धरितो
विनाशूनी दुष्टा सतत निजदासा सुखवितो
नियंता मी भूता समजुनि असे कर्म मजसी
समर्पी तू कर्मी मग तिळभरी बद्ध नससी – ४

करी सारी कर्मे विहित निरहंकार असुनी
त्यजी प्रेमद्वेषा धरुनी समता जो निशिदिनी
जया चिंता नाही पुढील अथवा मागिल मनी
खरा तो संन्यासी स्थिरमतिहि संकल्प सुटुनी – ५

चित्ताचा सखया निरोध करणे हा योग मानी खरा
हा मी हा पर भेद हा कधी नसे चित्ती मुळी ज्या नरा
जो सप्रेम सदा भजे मज जसा जो सर्वभूती सम
ठेवी मद्गत चित्त ज्याहुनी दुजा योगी नसे उत्तम – ६

माझ्या केवळ जाहली प्रकृतिने ही सारी सृष्टी सारी असे
पृथ्वीमाजी सुगंध मीच रस मी तोयांत पार्था वसे
सर्वांतर्गत मी परी नुमजती की ग्रस्त माया बळे
जे चित्ती मज चिंतिती सतत जे तापत्रया वेगळे – ७

सदा ध्याती मातें ह्रदयकमळी जे स्थिर मने
तया मी देहान्ती सुख अमित देतो हरि म्हणे
तरी पार्था माझे निशिदिनी करी ध्यान भजन
मिळूनी मद्रूपी मग चुकविसी जन्म मरण – ८

भक्तीने जल पत्र पुष्प फल की काही दुजे अर्पिले      
तै मातें नर जेवि जे नर सदा मत्कीर्तनी रंगले
पार्था तै मुख धन्य ज्या मुखी वसे मन्नामसंकीर्तन
विष्णो कृष्ण मुकुंद माधव हरे गोविंद नारायण – ९

कोठे देवासि चिंतू जरि म्हणसि असे ऐक माझ्या विभूती
संक्षेपे अर्जुना हे तुज गुज कथितो मी असे सर्वभूती
मी धाता विष्णू मी शिव रवी निगमी साम मी विश्वरूप
माझी सर्वत्र सत्ता जगी असुनि असे दिव्य माझे स्वरूप – १०

पार्थ विनवी माधवासी विश्वरूप भेटवा
म्हणुनिया हरी धरी विराट रूप तेधवा
मांडिला अनर्थ थोर पंडुकुमर घाबरे
म्हणे पुनश्च दाखवा विभो स्वरूप गोजिरे – ११

बरी सगुणभक्ति की भजन निर्गुणाचे बरे
पुसे विजय हे तदा हरि वदे तया आदरे
असोत बहु योग ते परिही भक्तियोगाहुनी
नसेच दुसरा तसा सुलभ जो श्रमावाचुनी – १२

क्षेत्रक्षेत्रज्ञ दोन्ही कथुनि मग पुढे कृष्ण पार्थासि सांगे
ज्ञानी त्यातें म्हणावा मज भजुनि कदा जो मदाने न वागे
ऐसा ज्या भेद बाणे प्रकृतिपुरुषिचा सर्व ठायी समत्व
कर्माची ज्यासि बाधा तिळभरही नसे पावला तो प्रभुत्व – १३

पार्था मी जनिता तशीच जननी माया जगत्संतती
जीवा सत्त्वरजस्तमादि गुण हे स्वाभाविक व्यापिती
जो सेवी परि भक्तिने मज तया जे बाधती ना गुण
झाला मत्सम तो प्रियाप्रिय नसे ज्याते नुरे मीपण – १४

उर्ध्वी मूळ तळी अपार पसरे अश्वत्थ संसार हा
छेदाया दृढ शस्त्र एकचि तया नि:संगता भूरुहा
ऐसे ओळखुनी क्षराक्षर मला जे पूजिती भारता
तै होती कृतकृत्य धन्य जगती पावोनि सर्वज्ञता – १५

दैवी प्रकृति लक्षणे मनि धरी धैर्य क्षमा प्रौढता
चित्तस्वास्थ्य दया शुचित्व मृदुता सत्यादि बा भारता
आता दंभ असत्य मत्सरिपणा वर्मी परां बोलणे
काम क्रोध अहंकृती त्यज सदा ही आसुरी लक्षणे – १६

सत्त्वरजस्तम तीन गुणांसह श्रद्धा तप मख दान असे
अशनहि तैसे निज बीजापरि आवडि त्यावरि दृढ बैसे
उत्तम मध्यम अधम जाण ही कर्मे त्यांतुनि सत्त्व धरी
मग ॐ तत्सत म्हणुनि धनंजय ब्रह्मसमर्पण कर्म करी – १७

त्यजू पाहसी युद्ध परी जे प्रकृति करवील तुजकडुनि
तरी वद पार्था परिसुनी गीता रुचते ममता का अजुनि
मग तो वदला मोह निरसला संशय नुरला खरोखरी
कृतार्थ झालो प्रसाद तव हा वचन तुझे मज मान्य हरी – १८

झाला देव गुरु प्रसाद म्हणुनी ज्ञानेश्वरी गायिली
ती भावे पठणार्थ नित्य बुध हो तुम्हां असे अर्पिली
घ्या सुर्पासम दोष सांडुनि गुणां होऊ नका चाळण
जी टाकी कण तूस घेई पदरी हे होय दुर्लक्षण

विवेकाने ज्याने सुघटित समाजा घडविले
महासिद्धांताचे ह्दय रसिकत्वे उकलिले
लसद्भक्तिज्ञाने तरतरविला धार्मिक तरु
तया ज्ञानेशाते विमळ मतिने वंदन करु.

Wednesday, July 20, 2016

His Last Bow



 बाबांचे शेवटचे भाषण..

 -----------------------------------------------------------------
ब्राह्मण विद्यालय शाळेच्या मुख्याध्यापिका व त्यांचे सर्व सहकारी तसेच माझ्या बालमित्रांनो, आज आपण गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यासाठी जमलो आहोत हे वेगळे सांगण्याची जरुर नाही तर या पौर्णिमेचे महत्त्व काय आहे, कशासाठी आपण ही पौर्णिमा साजरी करतो हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. आपल्या हिंदू पंचांगानुसार चैत्र ते फाल्गुन या प्रत्येक महिन्यात येणार् या पौर्णिमेचे महत्त्व हे वेगवेगळे जसे, चैत्र – हनुमान... मराठी महिन्याचे ३० दिवस असतात ते दोन विभागात असतात. पहिले १५ दिवस हे प्रतिपदा ते पौर्णिमा याला शुक्ल पक्ष म्हणतात व पुढचे १५ दिवस हे प्रतिपदा ते अमावस्या याला वद्य अथवा कृष्ण पक्ष म्हणतात.
    सध्या आषाढ महिना सुरु आहे. त्यातील पहिला पक्ष म्हणजेच शुक्ल पक्ष संपलेला आहे म्हणजे आज पौर्णिमा आहे. या पौर्णिमेलाच ‘गुरु पौर्णिमा/व्यास पौर्णिमा’ असे म्हणतात. हल्ली निरनिराळे दिवस साजरे केले जातात, जसे Mother’s Day, Father’s Day, Valentine’s Day हे सर्व पाश्चात्य राष्ट्रांकडून आपण आयात केलेले स्मरणांचे दिवस आहेत. परंतु आपल्या गुरुजनांचे स्मरण करण्याचा दिवस हा आपलेकडे गेली अनेक शतके सुरु आहे.


    आजच्या पौर्णिमेला गुरु पौर्णिमा/व्यास पौर्णिमा म्हणतात. महाभारत कोणी लिहिले, आपल्याला ठाऊक आहे का? तर हे महाभारत हे व्यासांनी लिहिले. ते फार विद्वान होते. आपल्या भारतात त्यांना आद्य गुरुचा मान दिला जातो, म्हणून आजच्या दिवसाला व्यास पौर्णिमा असेही म्हटले जाते. आचार्य महर्षी व्यास हे महाभारत काळात होऊन गेलेले महाज्ञानी, थोर विद्वान, श्रेष्ठतम ऋषी होते. त्यांच्याइतके  ज्ञानी, व्यासंगी, तपस्वी थोर गुरु अद्यापपर्यंत झालेले नाहीत अशी भारतीयांची धारणा आहे.
    त्यांनी लिहिलेल्या महाभारतामध्ये आपल्या जीवनाचे स्पष्ट, यथांग दर्शन दिसून येते. म्हणूनच असे म्हटले जाते, “व्यासोच्छिष्टं जगत्सर्वम्” म्हणजे “जे महाभारती नाही – ते अन्यत्र असेल क्वचित काही”. त्यामुळे आधुनिक  ज्ञानगंगेच्या प्रवाहाचा उगम हा महाभारतातून झाला असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. ‘व्यासोच्छिष्टं’ अधिक सोपे करुन सांगावयाचे झाल्यास असे सांगता येईल 

आपल्या शाळेत आपण निरनिराळे सण, उत्सव साजरे करतो त्यामधून आपल्याला नवीन नवीन गोष्टी, न मिळत असते. मला वाटते या वर्षी शाळा सुरु झाल्यावर आपण पहिलाच कार्यक्रम हा गुरुपूजनाचा करत आहोत. कारण जगामध्ये सन्मानाने जगावयाचे असेल तर ज्या ज्या साधनाद्वारे न, माहिती मिळते, त्या प्रत्येक साधनाचा वापर न, मिळविण्यासाठी केला पहिजे. उदा. वर्गात शिक्षक अथवा शिक्षिका गुरु असतात तसेच ग्रंथ हे देखील न बोलणारे गुरु आहेत. आधुनिक काळात संगणक, आकाशवाणी, दूरचित्रवाणी, भ्रमणध्वनी अशा अनेक साधनांद्वारे आपण न अथवा माहिती ग्रहण करत असतो पण हे ग्रहण केलेले न ‘नळी फुंकिली सोनारे, इकडून तिकडे गेले वारे’ या म्हणीप्रमाणे होता कामा नये. तर ते आपल्या मेंदूत साठवून ठेवावे लागते व ही साठवून ठेवण्याची सवय लहानपणापासून करावी लागते. याचा उपयोग आपल्याला पुढील आयुष्यात निश्चितपणे होतो, कसा ते आपण एक उदाहरण पाहू. आत्ता तुम्ही शाळेत पाढे पाठ करता ते एक प्रकारचे बेरीज अथवा गुणाकाराचे, भागाकाराचे गणितच हसतखेळत शिकत असता. पाढे जेवढे पक्के पाठ होतात, तेवढा त्याचा उपयोग व्यवहारात आपण सहजपणे करु शकतो.
    समजा तुम्ही पालकांबरोबर अगर स्वतंत्रपणे बाजारात गेलात व जी वस्तू आपल्याला खरेदी करावयाची आहे, उदा. भाजी, कुठलेही पीठ, धान्य, तर दुकानदाराने आपल्याकडून त्या वस्तूचे घेतलेले पैसे हे बरोबर घेतले आहेत का नाहीत हे एका क्षणात समजू शकते. समजा, भाजी ६० रुपये किलो आहे तर पाव किलोला १५ रुपये पडतील, पण आपल्याला त्यासाठी पावकीचा पाढा येणे आवश्यक आहे. असेच कुठल्याही वस्तूचा हिशोब करताना पाढ्यांचा उपयोग होतो. असे अनेक विषयातील, अनेक प्रकारचे न आपण सतत घेत असतो व हे न आपल्याला कोणाकडून तरी मिळत असते. न देणारी ही प्रत्येक व्यक्ती अगर वस्तू ही आपली त्या वेळची गुरु असते.
    अंध:कार हे अज्ञानाचे प्रतीक आहे तर प्रकाश हे ज्ञानाचे प्रतीक आहे. त्यामुळे अज्ञानापासून ज्ञानाकडे झेप घेणे यासाठी गुरु लागतो व म्हणून आपण त्या त्या गुरुंची आठवण ठेवण्यासाठी गुरु पूजन करतो.
    गुरु कसा असावा याचे आपल्याला माहित असलेले एक उदा. पाहू. द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मानित झालेले श्री. आचरेकर गुरुजी हे सचिन तेंडुलकरचे क्रिकेटमधील गुरु. अजूनही सचिन एवढा मोठा आंतरराष्ट्रीय कीर्तीचा महान खेळाडू होऊन क्रिकेटमधून निवृत्त झाला तरी आपल्या गुरुंचे स्मरण, वंदन केल्याशिवाय राहत नाही. २००५ मध्ये त्याच्याकडून धावा होत नव्हत्या, तो सरळ आचरेकर गुरुजींकडे गेला व आपल्या फलंदाजीमधील चुका कशा दुरुस्त करावयाच्या याचे परत धडे घेतले व परत तो जोमाने धावा करु लागला. दुसरे त्याचे गुरु म्हणजे त्याचे वडील. प्रत्येक शतकानंतर तो प्रथम आकाशाकडे पाहत असे व वडीलांचे स्मरण करीत असे कारण वडिलांनी त्याला क्रिकेटसाठी प्रोत्साहित केले व त्याच्या पाठिशी ठामपणे उभे राहिले.
    तेव्हा मुलांनो, आपल्याला जीवनात यशस्वी व्हावयाचे असेल तर जो जो प्राणिमात्र आपल्याला ज्ञान देईल, त्या सर्वांचे मन:पूर्वक स्मरण ठेवून पुढे वाटचाल करीत राहणे म्हणजेच जीवन यशस्वी करणे होय!